१ मे रोजी रत्नागिरी नगरपरिषदेच्या नव्या इमारतीचा शुभारंभ

रत्नागिरी- रत्नागिरी नगरपरिषदेची नवीन प्रशासकीय इमारत पूर्णत्वास आली असून येत्या १ मे रोजी या वास्तूचा शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या निर्देशानुसार हा उद्घाटन सोहळा पार पडणार असून, त्यासाठी सध्या नगरपरिषद कर्मचाऱ्यांची लगबग वाढलेली दिसून येत आहे.
जुन्या इमारतीतील कागदपत्रे, साहित्य आणि कार्यालयीन व्यवस्था नव्या इमारतीत हलवण्यासाठी कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ सुरू आहे. अनेक विभागांचे स्थलांतर अंतिम टप्प्यात असून उद्घाटनापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
नवीन इमारतीचे बांधकाम जवळपास पूर्ण झाले असून ही इमारत आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. त्यामुळे नगरपरिषदेचा कारभार अधिक सुटसुटीत, गतिमान आणि नागरिकाभिमुख होईल, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, जुनी इमारत लवकरच पाडण्यात येणार असल्याचीही माहिती मिळत आहे. नवीन वास्तूमुळे रत्नागिरी शहराच्या प्रशासनाला नवे रूप मिळणार असून नागरिकांच्या कामकाजातही अधिक सुलभता येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
कोकण ऑनलाईन रत्नागिरी



