खारवी पतसंस्थेची दमदार प्रगती; ३८ लाख नफा, ९७.२०% वसूली- संतोष पावरी

रत्नागिरी – “एक पाऊल आर्थिक सक्षमतेकडे” या ब्रीदवाक्याने वाटचाल करणाऱ्या खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्थेने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. संस्थेने ३८ लाखांचा निव्वळ नफा मिळवत ९७.२० टक्के वसूली साध्य केली असून नेट NPA केवळ १.८४ टक्के इतका कमी ठेवण्यात यश आले आहे, अशी माहिती संतोष पावरी यांनी दिली.
३१ मार्च २०२६ अखेर संस्थेचा एकत्रित व्यवसाय ४० कोटी १७ लाखांवर पोहोचला आहे. ठेवी २३.८९ कोटी, कर्ज वितरण १६.२८ कोटी आणि गुंतवणूक ९.४४ कोटी इतकी नोंद झाली आहे. तसेच खेळते भांडवल, स्वनिधी, ठेवी आणि कर्ज वितरणातही लक्षणीय वाढ झाली आहे.
२०१८ मध्ये सुरू झालेल्या या पतसंस्थेने अल्पावधीतच सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोविडसारख्या संकटांवर मात करत संस्थेने सातत्यपूर्ण आर्थिक प्रगती साधली आहे. पारदर्शकता, आर्थिक शिस्त आणि सभासदाभिमुख सेवा यामुळे संस्थेवर विश्वास अधिक दृढ झाला आहे.
संस्थेच्या या यशामागे सभासद, ठेवीदार, कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांचे एकत्रित प्रयत्न कारणीभूत असून भविष्यातही याच विश्वासाने आणि एकतेने पुढे जाण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
कोकण ऑनलाईन रत्नागिरी



