कोकणमहत्वाची बातमीमहाराष्ट्रराजकीयराष्ट्रीयसामाजिक

सहकारी संस्था केवळ वित्तपुरवठादार नव्हे, तर ग्रामीण विकासाचे केंद्र बनाव्यात

आंतरराष्ट्रीय परिषदेत दीपक पटवर्धन यांचे प्रतिपादन; ‘पॅक्स’ ग्रामीण अर्थकारणाचा कणा

रत्नागिरी- सहकारी संस्था या केवळ वित्तपुरवठा करणाऱ्या संस्था नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या सर्वांगीण विकासात त्यांचा बहुआयामी सहभाग महत्त्वाचा आहे. बदलते तंत्रज्ञान, बाजारपेठेतील स्पर्धा आणि पर्यावरणातील बदल स्वीकारून प्राथमिक कृषी सहकारी संस्थांनी आपल्या कार्यपद्धतीत परिवर्तन घडवून आणले पाहिजे. यातच सहकाराच्या यशस्वी वाटचालीचे गमक आहे, असे प्रतिपादन दीपक पटवर्धन यांनी केले.

पुणे येथील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेच्या आंतरराष्ट्रीय केंद्रात प्राथमिक कृषी सहकारी संस्थांच्या व्यावसायिक विकासासाठीच्या योजनांवर आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. या परिषदेला नेपाळ, म्यानमार, बांगलादेश, झांबिया, गॅम्बिया आणि भारतातील निमंत्रित प्रतिनिधी उपस्थित होते.

पॅक्स’ ग्रामीण अर्थकारणाचा कणा

प्राथमिक कृषी सहकारी संस्था अर्थात ‘पॅक्स’ या आजही ग्रामीण अर्थकारणाचा कणा आहेत. मात्र, बदलत्या काळात केवळ पारंपरिक पद्धतीने काम करून चालणार नाही. सहकारी संस्थांनी वित्तपुरवठ्याबरोबरच विविध व्यवसाय, आधुनिक तंत्रज्ञान आणि बाजारपेठेच्या नव्या संधींचा स्वीकार करणे आवश्यक आहे, असे पटवर्धन यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील सहकाराच्या एकात्मिक विकासाच्या प्रारूपाची माहिती दिली. सहकाराच्या माध्यमातून निर्माण झालेली आर्थिक गती आणि त्यातून साध्य झालेला प्रादेशिक विकास यांची विविध उदाहरणे देत त्यांनी तेथील प्राथमिक कृषी सहकारी संस्थांच्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला.

स्वरूपानंद पतसंस्थेच्या यशस्वी वाटचालीचा आढावा

स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेने भांडवलनिर्मितीच्या क्षेत्रात केलेली भरीव कामगिरी आणि त्यातून मिळालेले यश याबाबतही पटवर्धन यांनी सविस्तर विवेचन केले. संस्थेची अनुत्पादित मालमत्ता (एनपीए) ६३ टक्क्यांवरून शून्य टक्क्यांपर्यंत आणण्यासाठी केलेले प्रयत्न, नियोजन आणि त्यातून साध्य झालेले सकारात्मक परिणाम यांची माहिती त्यांनी आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींना दिली.

सहकारातून समृद्धी’चा दृष्टिकोन प्रत्यक्षात आणण्याचे आवाहन

पंतप्रधानांनी दिलेला ‘सहकारातून समृद्धी’ हा दृष्टिकोन प्रत्यक्षात साकारण्यासाठी सहकारी संस्थांमध्ये आवश्यक बदल घडवून आणण्याबरोबरच युवा वर्गाचा सक्रिय सहभाग वाढविणे गरजेचे आहे. नव्या पिढीला सहकाराच्या प्रवाहात सहभागी करून घेतल्यास सहकारी संस्थांना विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असेही त्यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून अधोरेखित केले.

आंतरराष्ट्रीय परिषदेत सहकारी संस्थांची यशोगाथा मांडण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करताना पटवर्धन म्हणाले की, उपस्थित प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांचे निरसन करता आले, याचा विशेष आनंद आहे. अशा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर वक्ता म्हणून मिळालेली संधी ही आपल्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी सहकार क्षेत्रातील वाटचालीची पावती असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

कोकण ऑनलाईन

10/10/2026

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button