महिला पोलिसाचा प्रसूती दरम्यान दुर्दैवी मृत्यू; बाळही दगावल, रत्नागिरीत हळहळ

रत्नागिरी- रत्नागिरी जिल्हा पोलीस दलात पोलीस हेडकॉन्स्टेबल असलेल्या महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे. सांची सुदेश सावंत (38, रा. हेरिटेज सोसायटी, आरोग्य मंदिर,रत्नागिरी) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या महिला पोलिस हेडकॉन्स्टेबलचे नाव आहे. प्रसूतीच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, सांची सावंत या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात महिला कक्षात हेडकॉन्स्टेबल या पदावर कार्यरत होत्या. त्या सध्या प्रसूतीच्या रजेवर होत्या. प्रसूतीसाठी त्यांना रत्नागिरी येथे एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र यावेळी त्यांना अचानक आकडी आल्याने त्या बेशुद्ध झाल्या. अधिक उपचारासाठी तातडीने दुसर्या एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, यावेळी उपचार दरम्यान त्यांचा दुर्दैवीरीत्या मृत्यू झाला आहे.
सांची सावंत यांचे पतीही रत्नागिरी पोलीस विभागातील डॉग स्कॉड पथकात पोलीस अंमलदार म्हणून कार्यरत आहेत. या दाम्पत्याला दोन मुली आहेत. सांची या तिसर्यावेळी गर्भवती असताना त्यांना प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.



