धामणी गावात अनोखी परंपरा: संपूर्ण गाव एकत्र येतो ‘देवाची शेती’ करण्यासाठी
संगमेश्वर – संगमेश्वर तालुक्याच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या धामणी गावात एक अनोखी व प्रेरणादायी परंपरा आजही कायम आहे. येथे दरवर्षी गावातील सर्वजण एकत्र येऊन “पावसाळी देवाची शेती” करतात. श्री स्वयंभू बाजीदेव मंदिराच्या मालकीच्या जमिनीवर पारंपरिक पद्धतीने केली जाणारी ही शेती सामाजिक ऐक्याचा जिवंत नमुना ठरते.
गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही परंपरा पिढ्यानपिढ्या सुरू असून तिचा उद्देश फक्त शेती नव्हे, तर धार्मिक व सामाजिक कार्यासाठी निधी उभारणे हा आहे. या शेतीतून होणारे उत्पन्न गावातील मंदिरात होणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी वापरले जाते.

या वर्षीही ही परंपरा उत्साहात पार पडली. सुमारे १५ किलो भात बियाण्यांची पेरणी करण्यात आली असून शेतीची कामे पूर्ण करण्यासाठी तीन दिवस लागले. विशेष म्हणजे, या कामासाठी गावातील प्रत्येक घरातून एक ते दोन माणसे सहभागी झाली होती. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण शेतात राबले.
शेतीसाठी पारंपरिक १० बैलजोड्यांचा वापर करण्यात आला. बैलजोड्यांच्या साहाय्याने शेतीची नांगरणी करून त्यावर लावणी केली गेली. लावणीच्या वेळी पारंपरिक गीते गात वातावरणात भक्तिभाव निर्माण करण्यात आला. संपूर्ण प्रक्रिया पारंपरिक शेती पद्धतीनेच पार पडली, यात यंत्रांचा वापर टाळण्यात आला.
धामणी गावातील ही ‘देवाची शेती’ गावकऱ्यांमध्ये ऐक्य, समर्पण आणि श्रद्धा टिकवून ठेवणारी परंपरा आहे. आधुनिक युगातही अशी एकत्रित भावना जपणारे गाव दुर्मीळच म्हणावे लागेल. धामणीची ही परंपरा इतर गावांसाठीही आदर्श ठरणारी आहे.



