कोकणपर्यटनमहत्वाची बातमीमहाराष्ट्रसामाजिक

लोकशाही दिनातील अर्ज तत्काळ निकाली काढा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल

रत्नागिरी – लोकशाही दिनात प्राप्त होणारे तसेच प्रलंबित अर्ज तात्काळ मार्गी लावावेत, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी संबंधित विभागांना दिल्या. वन जमिनींवर अनधिकृत कामे होत असल्यास वन विभागाने सतर्क राहून तत्काळ कारवाई करावी, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित लोकशाही दिन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वजीत गाताडे, पोलीस उपअधीक्षक राधिका फडके, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी प्रविंद बिरादार आदी उपस्थित होते.

या बैठकीत जिल्हाधिकारी जिंदल यांनी मागील प्रलंबित अर्जांचा सविस्तर आढावा घेतला. तसेच नव्याने दाखल झालेल्या अर्जांवर संबंधित विभागांनी कोणती कार्यवाही केली आहे, याबाबत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. सर्व अर्जांची निकाली काढणी जलद गतीने करून त्याचा अहवाल आठवड्याभरात सादर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हा परिषद व बांधकाम विभागाने प्राप्त अर्जांवर योग्य प्रक्रिया राबविली आहे का, याची पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले. प्रक्रिया अपूर्ण असल्यास जमिनीच्या नुकसानीचा मोबदला देण्याबाबत कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले. तसेच मोजणीसंबंधित प्रकरणे प्राधान्याने निकाली काढावीत, असे निर्देश देण्यात आले.

दरम्यान, ऐतिहासिक पर्यटन स्थळ किल्ले रसाळगड येथील जनसुविधा केंद्र, रस्त्यांचे डांबरीकरण आणि संरक्षण भिंतीसंदर्भात जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी पुरातत्व विभागाशी समन्वय साधून आवश्यक पत्रव्यवहार करावा, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.

वन विभागाने त्यांच्या हद्दीत होणाऱ्या कोणत्याही अनधिकृत कामांवर लक्ष ठेवून तत्काळ कारवाई करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button