लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीच्या अध्यक्षपदी सुमीत ओसवाल; दिमाखदार पदग्रहण सोहळ्यात नव्या कार्यकारिणीची शपथ

रत्नागिरी – लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी आणि लिओ क्लब ऑफ रत्नागिरी यांच्या २०२६-२७ वर्षातील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा शनिवारी (४ जुलै) मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. समाजसेवेचा दृढ संकल्प करत लायन सुमीत भैरूमल ओसवाल (MJF) यांनी अध्यक्ष, लायन ललित शहा यांनी सचिव, तर लायन प्रदीप हर्चिरकर यांनी खजिनदार म्हणून पदाची शपथ घेतली.
या सोहळ्यास पदप्रदान अधिकारी म्हणून मसूर क्लबचे माजी प्रांतपाल पीडीजी लायन जगदीश पुरोहित (PMJF, Vice Area GAT Leader) उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. त्यानंतर नृत्यार्पण ॲकॅडमीच्या नृत्यांगनांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी सामाजिक बांधिलकी जपत जिल्हा परिषद शाळा क्रमांक २, वायंगणी या शाळेला कपाट भेट देण्यात आले. मावळते अध्यक्ष लायन संजय पटवर्धन, सचिव लायन शरद नागवेकर, खजिनदार लायन मनोज सावंत तसेच लिओ क्लबचे मावळते अध्यक्ष शशांक तांबे यांनी वर्षभरातील कार्याचा आढावा घेत सर्व सदस्यांचे आभार मानले.
नव्या अध्यक्ष सुमीत ओसवाल यांच्या कार्यकारिणीतील विविध पदाधिकाऱ्यांनाही यावेळी पदाची शपथ देण्यात आली. तसेच लिओ क्लब ऑफ रत्नागिरीच्या अध्यक्षपदी लिओ अमृत गोरे, सचिवपदी लिओ रुतूजा शिंदे आणि खजिनदारपदी लिओ चिन्मय प्रभू यांनी पदभार स्वीकारला.
कार्यक्रमात मावळत्या पदाधिकाऱ्यांचा तसेच बहुप्रांतीय परिषदेत मानाचे पुरस्कार प्राप्त केलेल्या लायन सदस्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित रिजन चेअरमन डॉ. निलेश पाटील, झोन चेअरमन शिल्पा पानवलकर आणि चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. संतोष बेडेकर यांनी नव्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत समाजसेवेचे कार्य अधिक व्यापक करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन अभिजित गोडबोले आणि लायन श्रेया केळकर यांनी केले. अध्यक्ष सुमीत ओसवाल यांनी आपल्या मनोगतात, “येणाऱ्या वर्षभरात समाजातील विविध घटकांसाठी अधिकाधिक विधायक उपक्रम राबवून लायन्स क्लबची समाजसेवेची परंपरा अधिक बळकट करू,”अशी ग्वाही दिली. या पदग्रहण सोहळ्यास क्रेडाईची संपूर्ण टीमसह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि लायन्स परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
कोकण ऑनलाईन रत्नागिरी
05/07/2026



