नेत्र रुग्णालय व समाजोपयोगी सेवेसाठी लायन्स महोत्सवाचे आयोजन

रत्नागिरी- नेत्र रुग्णालय व विविध समाजोपयोगी सेवा उपक्रमांसाठी निधी संकलनाच्या उद्देशाने लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीच्या वतीने भव्य लायन्स महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. हा औद्योगिक कंझ्युमर आणि फूड फेस्टिव्हल स्वरूपाचा फॅमिली फेस्टिव्हल १४ जानेवारी ते १९ जानेवारी २०२६ या कालावधीत आर. बी. शिर्के हायस्कूल मैदान, माळ नाका, रत्नागिरी येथे होणार असल्याची माहिती लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष संजय पटवर्धन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी गेल्या ५२ वर्षांपासून शिक्षण, आरोग्य, क्रीडा, संस्कृती व पर्यावरण या क्षेत्रात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत रत्नागिरी परिसरात आपला ठसा उमटवत आहे. क्लबच्या माध्यमातून पाळणाघर, वैद्यकीय सेवा केंद्र, मधुमेह निदान केंद्र, डायलिसिस सेवा केंद्र असे अनेक महत्त्वाचे प्रकल्प राबवले जात आहेत.
आजपर्यंत लायन्स क्लबमार्फत ४० हजारांहून अधिक नेत्र शस्त्रक्रिया तसेच दोन लाखांपेक्षा जास्त नेत्र तपासण्या करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
या पत्रकार परिषदेला लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोकण ऑनलाईन रत्नागिरी



