कोकणक्रीडामहत्वाची बातमीमहाराष्ट्र

पालीत जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न — पुरुषांत दसपटी चिपळूण, महिलांत रत्नागिरी तालुका संघ विजेता

रत्नागिरी – राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त पाली युवा मंचतर्फे आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुष विभागात दसपटी क्रीडामंडळ, चिपळूण तर महिला विभागात रत्नागिरी तालुका महिला संघाने विजेतेपद पटकावले. पाली येथे झालेल्या या स्पर्धेला क्रीडारसिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. अनेक सामने चुरशीचे झाल्याने मैदानावर रोमांचक वातावरण निर्माण झाले होते.

स्पर्धेत पुरुष गटात १६ तर महिला गटात ४ संघांनी सहभाग नोंदवला होता. पुरुषांच्या अंतिम सामन्यात चिपळूण तालुक्यातील दोन संघांमध्ये रंगतदार लढत झाली. त्यात दसपटी क्रीडामंडळाने गुरुकुल संघावर चार गुणांनी मात करत विजेतेपद मिळवले. तृतीय क्रमांक चिपळूणच्या संघर्ष क्रीडामंडळाने तर चौथ्या स्थानावर रत्नदीप क्रीडामंडळ, मिरजोळे यांनी समाधान मानले.

अंतिम सामन्यात सामनावीर पुरस्कार शुभम कदम याला मिळाला. अष्टपैलू खेळाडू अभि शिंदे, उत्कृष्ट पकड निलेश व आकाश शिंदे तर उत्कृष्ट चढाईचा मान शुभम कदम यांच्या वाट्याला आला.

महिला विभागात रत्नागिरी तालुका संघाने लांजा तालुका संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले. महिला गटातील अष्टपैलू खेळाडूचा किताब मैथिली गावकर तर उत्कृष्ट पकड पुरस्कार स्वरा भाटकर हिला देण्यात आला.

विजेत्या-उपविजेत्या संघांना लांजा–राजापूरचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या हस्ते गौरवण्यात आले. या वेळी पाली युवा मंचचे अध्यक्ष अमेय वेल्हाळ, तालुकाप्रमुख बाबू म्हाप, युवासेनेचे मुन्ना देसाई, जिल्हा बँक संचालक रामभाऊ गराटे, उपसरपंच संतोष धाडवे आदी मान्यवर उपस्थित होते. पाली युवा मंचतर्फे दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात, त्याचाच एक भाग म्हणून ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडली.

कोकण ऑनलाईन रत्नागिरी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button