संगमेश्वर तालुका संघटकपदी मेघा मंगेश कदम यांची नियुक्ती

संगमेश्वर- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने रत्नागिरी (दक्षिण) जिल्ह्यातील शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून, संगमेश्वर तालुका संघटक म्हणून मेघा मंगेश कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मेघा मंगेश कदम या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या कट्टर शिवसैनिक असून, त्यांनी ग्रामपंचायत सरपंच, रत्नागिरी जिल्हा बाजार समिती संचालक तसेच महिला बचत गटांच्या माध्यमातून प्रभावी सामाजिक कार्य केले आहे. पक्षाबाबतची एकनिष्ठा, दांडगा जनसंपर्क आणि सामाजिक कार्याचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन त्यांची संगमेश्वर तालुका संघटकपदी निवड करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
या नियुक्तीबद्दल संगमेश्वर तालुक्यातून मेघा मंगेश कदम यांचे अभिनंदन होत आहे. पक्षाने दाखविलेला विश्वास नक्कीच सार्थ ठरवीन आणि पक्ष अधिक जोमाने वाढवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीन, अशी प्रतिक्रिया नूतन तालुका संघटक मेघा मंगेश कदम यांनी दिली आहे.
दरम्यान, शिवसेना उपनेते व माजी खासदार विनायक राऊत यांनी मेघा मंगेश कदम यांचा सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख दत्ताजी कदम, रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख सुरेश कदम, माजी पालकमंत्री रवींद्र माने, नेहा माने,माजी जिल्हा परिषद सदस्य थेराडे, मधुकर गुरव,प्रकाश घाणेकर यांच्या सह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातील वरिष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
कोकण ऑनलाईन



